विषय : माननीय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम
दि. १० जून २०२६ रोजी मातोश्री आयुर्वेद महाविद्यालय, धानोरे,ता. येवला, जि. नाशिक येथे माननीय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व सुमारे २०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी स्तवन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यापीठ गीत गायन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी विद्यापीठ गीत एकत्रितपणे गाऊन विद्यापीठाच्या स्थापनेबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यापीठाच्या स्थापनेचा उद्देश, कार्य व आरोग्य शिक्षण क्षेत्रातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यापीठाबद्दलचा अभिमान व कृतज्ञता व्यक्त केली.
वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच मातोश्री आयुर्वेद महाविद्यालयाच्या व रुग्णालयाच्या वतीने गोपालवाडी येथे रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे ठरले.






